बांगलादेशी घुसखोरच तृणमूल काँग्रेसची व्होटबँक; ममता बॅनर्जी यांच्यावर अमित शहा यांची जोरदार टीका संसदेमध्ये नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन (एनआरसी) वर चर्चा होत असताना ममता त्याला विरोध करत होत्या.

कोलकाता : पश्चिम बंगालला बांगलादेशी घुसखोरांनी पोखरले असून ते ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसची व्होटबँक असल्याचा आरोप भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आज केला. भाजपच्या युवा मोर्चाद्वारे आयोजित केलेल्या युवा स्वाभिमान सभेमध्ये ते बोलत होते.

सकाळी शहा यांच्या सभेसाठी कार्यकर्त्यांना आणायला गेलेल्या बसवर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली होती. तसेच तृणमूल काँग्रेसकडून पोस्टरबाजीही करण्यात आली होती. यावरून शहा यांनी ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर जोरदार टीका केली. आपली सभा राज्यातील जनतेने न पाहण्यासाठी चॅनेलवरही बंदी आणल्याचा आरोप त्यांनी केला.

भाजप बंगाल विरोधी नसून ममता विरोधी आहे. आमच्या पक्षाची सुरुवातच बंगालच्या शामा प्रसाद मुखर्जी यांनी केली, मग भाजप पश्चिम बंगाल विरोधी कसा होईल, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. संसदेमध्ये नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन (एनआरसी) वर चर्चा होत असताना ममता त्याला विरोध करत होत्या. आसाममधील घुसखोरांना खड्यासारखे निवडून बाजुला करण्यात येणार आहे. ममता यांच्या विरोधामुळे ही प्रक्रिया थांबणार नाही. ममता कोणत्या उद्देशाने बांगलादेशी घुसखोरांना छत्रछाया देत आहेत. काँग्रेसनेही याबाबत आपली भुमिका स्पष्ट करावी, असे आव्हान शहा यांनी आज दिले.

तसेच व्होटबँकमुळे राहुल गांधी यावर बोलत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. ममता आणि काँग्रेसने देशाला प्रथम स्थान की व्होटबँकेला ते आधी स्पष्ट करावे. एनआरसी कायद्यामुळे शरणार्थींना कोणताही धोका होणार नाही, याची आपण ग्वाही देतो, असेही शहा म्हणाले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*